आम आदमी का हात एनसीपी के साथ

अरेरे ……. काय घडले हे …….. जाणत्या राजाच्या कानाखाली आवाज ????  आणि त्यावरच्या प्रतिक्रिया तर त्याहून भन्नाट.

१) अण्णा : थप्पड मारा ? एकही मारा ??

२) बाळासाहेब : शरद पवारांवरील हल्ला घृणास्पद आहे. पवारांचा हा असा अपमान मराठी माणूस कदापिही सहन करणार नाही

3) रामदास आठवले (रिपाइं अध्यक्ष) : समाजकारणात व राजकारणात संपूर्ण आयुष्य घालवणार्‍या शरद पवार यांच्यावरील हल्ला तीव्र निषेधार्ह आहे.

4) राज ठाकरे : हा हल्ला निषेधार्हच आहे. हल्लेखोराला महागाईविरोधातच राग व्यक्त करायचा होता तर मनमोहन सिंग यांच्यापासून सुरुवात करायची होती.

5) मनोहर जोशी : कोणतेही प्रश्‍न असे हल्ले करून सुटत नाहीत. या भ्याड हल्ल्याचा शिवसेनेच्या वतीने मी निषेध करतो.

6) अजितदादा (जाणत्या राजाला थोबाडल्यानंतर लगेचच एका पत्रकार परिषदेत) : साहेबांना 'जसा जाता जाता एखाद्याला लागतो तसा' धक्का लागला असं साहेबांनी मला सांगितलं आहे.

याव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या खास खास लोकांच्या मिठाला जगणाऱ्या प्रतिक्रिया म्हणजे व्यक्तीपूजेचा भारतीय पेटंटेड नमुनाच. सर्वात कहर स्वत: साहेबांनीच केला. हरविंदरसिंग ने काडकन कानाखाली काढलेला आवाज तमाम लोकांनी पहिला व ऐकला. पण साहेबांनी मीडियासमोर सारवासारव केली कोई एक इन्सान ने पीछेसे मुझपर हमला किया मैने एक स्टेप आगे बढाया तो उनका हाथ यहासे ऐसे निकल गया! आहे की नाही निर्लज्जपणा ? एवढा आवाज आल्यावरतरी निदान म्हणा की दुखतंय म्हणून.

या घटनेनंतर महाराष्ट्रात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेला शरद पवारांचा एकदम कोण पुळका आला. शिवसेनेने या थोबाडफोडीला मराठी माणसाचा अपमान ठरवून टाकले, जसेकाही हरविंदरसिंगने मराठी माणूस म्हणून कानफटात मारली. अरे तो तर ओरडून ओरडून सांगत होता की मी चोरांना ठोका दिलाय. इथे मराठी मराठी माणूस वगैरे मुद्दा आलाच कुठे ?

एकूणच सर्वच राजकीय पक्षांनी अहमहिकेने हरविंदरसिंगला माथेफिरू ठरवून टाकले. सोयीचा आचार विचार नसलेल्या व्यक्तीला माथेफिरू ठरवणे हा खास राजकीय खेळ आहे. अशा प्रकारे कानफटात मारणे हा निषेधाचा मार्ग होऊ शकत नाही त्यासाठी योग्य सनदशीर वा कायदेशीर मार्ग वापरायला पाहिजे ही अपेक्षा जवळ जवळ प्रत्येकाने व्यक्त केली आहे. पण हा मार्ग कोणता हे कोणीच विषद करत नाही. निर्लज्ज वा कोडग्या , गेंड्याच्या कातडीच्या मंडळींना जाग येईल असा कोणता मार्ग सामान्य माणसापाशी आहे हे कुणी सांगेल का ?

साहेबांनी म्हणे उदार मनाने हल्लेखोराला माफ केले. कार्यकर्त्यांना दंगा करू नका, शांत रहा वगैरे आवाहन केले. वृत्तपत्रातून या औदार्याचा दिन्डोराही पिटला. पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बहुधा अशिक्षित असावेत त्यामुळे पक्षाच्या मालकांच्या या छापील उदार माफीची दखल न घेता सर्वच प्रमुख शहरे बंद करण्यात आली व धुडगुस घातला गेला. महाराष्ट्राचे गृहखातेच हाती असल्याने कोणत्याही कार्यकर्त्याला कारवाईची जराही भीती नव्हती. कोर्टात हजर केलेल्या हरविंदरसिंगला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोर्टातच ठोकून काढले. अहा रे पुरुषार्थ !

सर्वात वाईट भाग म्हणजे लोकांच्या मनात असलेल्या नाराजी, उद्वेग, चीड वगैरे बाबींकडे सर्व राजकीय नेत्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले. सर्वांनीच गळ्यात गळे घालून सांत्वन केले व निषेध व्यक्त केला. पण मुळात ही परिस्थिती का उद्भवली यावर कुणीच विचारमंथन केले नाही. साध्या मनातल्या भावनाही मोकळेपणानी व्यक्त केल्या नाहीत. मुळात सगळेच चोर, त्यामुळे कोण कुणाला नावे ठेवणार ? अण्णा हजारे मात्र मुरलेले राजकारणी नसल्याने चटकन खरे बोलून गेले. “ थप्पड मारा ? एकही मारा ?? ” ही खरे तर प्रत्येक सामान्य माणसाची पहिली प्रतिक्रिया. लोक खरे तर खुश झाले. कारण मुळात सामान्य माणसासाठी ही थप्पड मुजोर राजकारणी मंडळीना होती. शरद पवार केवळ निमित्तमात्र……. कोणतीही जबाबदारी झटकणारा हा जाणता राजा लोक सहन तरी किती करणार ? या कृषीमंत्राच्या काळात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या, पण याला कृषिमंत्री जबाबदार नाही. सर्वात जास्त प्रमाणात अन्नधान्य वा वस्तूंची महागाई झाली, पण त्यालाही हा अन्नधान्य पुरवठा मंत्री जबाबदार नाही. वा रे प्रशासन आणी वा रे राजा.    

रोम जळताना फिडल वाजवत बसलेल्या निरो राजसारखीच वृत्ती असलेले भारतीय नेते या घटनेने तरी खडबडून जागे व्हावेत. भारताबाहेर सद्ध्या राजकीय प्रणाली बदलाचे वारे जोरात आहेत. धग प्रामुख्याने हुकुमशाही विरोधात असली तरी ही क्रांती आपल्यापासून फार दूर नाही. लोकक्षोभ व सत्ताधीशांची अमर्याद हाव तर दोन्हीकडे समानच आहेत. चीड व्यक्त करणाऱ्याला माथेफिरू ठरवून दुर्लक्ष करणे महाग पडू शकेल.

(कार्टून व फोटो आंतरजालावरून साभार)